कामगारांना सुरक्षा किट वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे : मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली मागणी
कुडाळ
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षा किट वितरणाच्या नियोजनासंदर्भात काल बुधवारी मनसे शिष्टमंडळ व वितरक बाह्यस्त कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियोजनपर बैठक घेण्यात आली. काही दिवसापूर्वी ओरोस, कणकवली येथील शिबिरात सुरक्षा किट वितरण करताना कंत्राटदार संस्थेच्या नियोजन शून्य कारभारामुळे कामगारांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असून वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीमुळे मनसेने वितरण शिबिर बंद पाडले होते व जोपर्यंत वाटपसंबंधी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करून कामगारांना सुलभ पद्धतीने वितरण होत नाही तोपर्यंत वाटप थांबवावे, अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने बुधवारी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात मनसेचे शिष्टमंडळ कंत्राटदार व्यवस्थापक लवेकर व दुकाने वा आस्थापना निरीक्षक सुविधाकार कुबल यांची संयुक्त नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीत कामगारांना सुरक्षा किट वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मांडली. शिवाय कामगारांची होणारी गर्दी सुलभ पद्धतीने हाताळण्यासाठी शिबीर ठिकाणी कर्मचारी मनुष्यबळ वाढवण्यात यावे, तसेच कीट वाटप करताना महिला कामगारांसाठी व पुरुष कामगारांसाठी स्वतंत्र वाटप यंत्रणा कार्यान्वित करावी, तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करत असताना किमान तीन ते चार दिवस अगोदर वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी देण्यात यावी, प्रत्येक तालुक्यातील कामगाराना त्याच तालुक्याच्या ठिकाणी किट सुपूर्द करावे, अशा प्रकारच्या सूचना मनसेच्या शिष्टमंडळाने मांडल्या. कंत्राटदार संस्था व्यवस्थापक व सुविधाकार कुबल यांनी मनसेच्या रास्त सूचनानुसार योग्य पद्धतीने वाटप प्रक्रिया राबविण्याचे मान्य केले.
त्या अनुषंगाने येत्या शनिवारपासून तालुकानिहाय टप्प्याटप्प्याने शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले. त्यानुसार शनिवार व रविवारी कुडाळ वासुदेवानंद सरस्वती सभागृहात वाटप शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. टप्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कुबल यानी सांगितले. यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष कुणाल किनळेकर, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, कामगार प्रतिनिधी सतीश कदम व पत्रकार उपस्थित होते. जिल्ह्यातील कामगारांना सुरक्षा किट वाटप या संबंधात कोणत्याही समस्या वा कृती आढळून आल्यास वा अडचणी आल्यास कामगारांनी मनसेशी संपर्क साधावा, असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मीडियाशी बोलताना केले.