You are currently viewing दोडामार्ग तालुक्याला पावसाने झोडपले

दोडामार्ग तालुक्याला पावसाने झोडपले

ठिकाठिकाणी झाडे,वीजेचे खांब पडले; अनेक गावे अंधारात

दोडामार्ग

तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे पडली होती.त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

दोडामार्ग तिलारी मार्गावर झरेबांबर येथे , पिकुळे उसप मार्गावर,कळणे भिकेकोनाळ रस्त्यावर भिकेकोनाळ येथे रस्त्यात झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती तर विजेचा खांब रस्त्यात कोसळल्याने वीज प्रवाह खंडित झाला होता. साटेली भेडशी ते तिलारी मार्गावर वायंगणतड येथे रस्त्यात झाड पडल्याने वाहतूक खोळंबली होती.मोर्ले येथे टस्कराने ढकलून टाकलेला भेडले माड विद्युत वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्या तुटून रस्त्यात पडल्या.त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यात झाडे कोसळून मार्ग बंद होण्याचे,प्रवाशांचा खोळंबा होण्याच्या अनेक घटना घडल्या.स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत श्रमदान करून काही ठिकाणी झाडे तोडून रस्ता खुला करण्यात आला तर काही ठिकाणी जेसीबी यंत्राचा वापर करण्यात आला.

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस (१६९.९ मि.मी.) दोडामार्ग तालुक्यात पडला.तिलारी नदीची पाण्याची पातळी ३८.५० मीटर एवढी आहे इशारा पातळी ३१.६० तर धोक्याची पातळी ४३.६० आहे.तूर्तास पाणी इशारा पातळीच्या खाली असल्याने काठावरील गावांना धोका नाही.
विजेचा खेळखंडोबा सुरूच

तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे विद्युत वाहिन्यावर तुटून पडल्याने विद्युत प्रवाह खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात होती.मंगळवारी रात्रीपासून अनेक गावातील बत्ती गुल झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा