You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय…

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गैरसोय…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार:माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर

बांदा

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे प्रशासकीय बदली झाल्याने येथे रिक्त झालेल्या पदी अद्यापपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात न आल्याने येथील आरोग्य सेवेवर याचा परिणाम झाला आहे. बांदा हे महामार्गावरील महत्वाचे शहर असल्याने व याठिकाणी टेलिमेडिसिन केंद्र असल्याने तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या तथा रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी सांगितले आहे.

कोरगावकर म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ओपिडी असलेले बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी सातत्याने दिवस रात्र रुग्णांची वर्दळ हि मोठ्या संख्येने असते. त्यामुळे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी पद हे तात्काळ भरणे गरजेचे आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम बांदा येथे टेलिमेडिसिन सेवा केंद्र दिले आहे. या माध्यमातून येथील रुग्णांना मुंबई येथील नामांकित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय उपचार तसेच सल्ला मोफत मिळत आहे. याठिकाणी प्रसूती गृह देखील आहे. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना किंवा नातेवाईकांना वैद्यकीय दाखले मिळण्यासाठी सावंतवाडी येथे जावे लागत आहे. रुग्णांची होणारी फरफट थांबविण्यासाठी तात्काळ वैद्यकीय अधिकारी नेमावा, यासाठी प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून पालकमंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा