वैभववाडी तालुका काँग्रेस तर्फे तहसीलदारांना निवेदन
वैभववाडी
तलाठी भरती व इतर भरती प्रवेश प्रक्रिये साठी प्रवेश शुल्काच्या नावाखाली विद्यार्थांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभाग मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वैभववावडी तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
तलाठी संवर्गासह वनविभाग, कृषीविभाग व इतर काही शासकीय विभागांमार्फत विविध पदे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी ही आशादायक गोष्ट आहे. मात्र या विविध पदांसाठीचे फॉर्म भरण्यासाठी जी अवाढव्य फी आकारली जात आहे ती अर्जदारांना न परवडणारी आहे. किंबहुना ही फी भरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. अर्ज फी 1000 रुपये व फॉर्म भरण्याचे 200 ते 300 रुपये असल्यामुळे बऱ्याच उमेदवारांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. सर्वसामान्य उमेदवारांनी परीक्षा शुल्कासाठी आकारलेले इतके पैसे कुठून आणायचे ? असा प्रश्न सर्व प्रवर्गातील तरुणांना पडलेला आहे. यापूर्वी विविध भरती प्रक्रियेत 200 ते 300 रुपयांपेक्षा ज्यादा फी आकारली जात नव्हती. मात्र आता भरमसाठ शुल्क आकारुन बेरोजगारांकडून मोठे महसुली उत्पन्न शासन वसुल करीत आहे ही बाब अन्यायकारकच आहे. या बेरोजगार युवकांच्या संख्येचा गैरफायदा घेवून भरतीप्रक्रियेत भरमसाठ शुल्क आकारून या युवकांवर अन्याय होत आहे. आज प्रत्येक शिकलेला तरुण अर्ज भरत असतो त्यांनी एवढे पैसे कुठून आणून भरणार. गोरगरीब बेरोजगारांचे पालक ही एवढी फी भरु शकत नाहीत. परिणामी गोरगरीब जनतेच्या पाल्यांचे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढेल. नैराश्यातून काही तरुण गैरमार्गाला जात आहेत. या सामाजिक अध:पतनास शासनच जबाबदार असेल. त्यामुळे ही परिस्थिती जर थांबवायची असेल तर बेरोजगारांची ही आर्थिक लूट तात्काळ थांबविण्यात यावी. कोणत्याही भरतीप्रक्रियेत अर्जदाराकडून 200 रुपयांच्या वर फी आकारली जावू नये. नुकत्याच सुरु असलेल्या भरतीप्रक्रियेत ज्या अर्जदारांनी भरमसाठ फी भरली आहे, ती 200 रुपयांवर आणून उर्वरित पैसे अर्जदारांना परत केले जावेत. आमच्या या मागणी वर त्वरित निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करावी व परीक्षार्थी युवकांना न्याय मिळावा यासाठी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (रोजगार व स्वयंरोजगार विभाग सिंधुदुर्ग ) यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार ला तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष गुलजार काझी, वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव मीनाताई बोडके ,वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष प्रांजली जाधव तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, वसीम काझी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.