भुईबावडा दशक्रोशितील प्रवाशांची खारेपाटण-कुरूंदवाड एसटी बस सुरू करण्याची मागणी
वैभववाडी
गेली चार दशकांपासून सुरू असलेली खारेपाटण-कुरूंदवाड एस टी बस कोरोना काळापासून तब्बल तीन वर्षे बंद आहे. त्यामुळे कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. तरी एसटी बस कायमस्वरूपी चालू करावी अशी मागणी भुईबावडा दशक्रोशीतील प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.
खारेपाटण कुरूंदवाड ही एसटी बस गेली ४० वर्षे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात नियमितपणे धावत होती. तीन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनामुळे ही एसटीबस बंद केली होती. त्यानंतर घाटमार्गातील रस्ते खराब तसेच प्रवासी नसल्याचे कुरूंदवाड आगारातून सांगितले जात होती. परंतु याचा फटका प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे. कोल्हापूरला खाजगी वाहनाने जाताना खिशाला कात्री बसत आहे.
या एसटी बसला दररोज प्रवासी होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच घाटमार्गातील रस्ते निर्धोक असल्याने कुरुंदवाड आगाराने कोकणात नियमितपणे पूर्वीच्या वेळेप्रमाणे एसटीबस सोडावी. अशी मागणी भुईबावडा दशक्रोशीतील प्रवासी व नागरिकांमधून केली जात आहे.