*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कधी वाटली ना खंत…*
माझी शाळा माझं धन तिच माझी कर्मभूमी
कधी वाटली ना खंत जरी वारी नाही केली…
इमान नि इतबारे रोज सांभाळली शाळा
माझे टाळ नि मृदुंग माझे खडू माझा फळा…
घरा पासुन शाळेत रोज रोज केली वारी
रोज वर्गात बसती सामोरीच श्रीहरी…
त्यांचे निरागस बाल्य त्यात पाहिला मी देव
ज्ञानदान नि कल्याण हाच भक्तिभाव ठेव …
ज्ञानदाना परी नाही श्रेष्ठ कोणती कमाई
तिच माझी चंद्रभागा तिच माझी रखूमाई..
नाही अभिलाषा मनी कधी पंढरीस जावे
वर्गातल्या बालकात रोज श्रीमुख पहावे…
किती घडवले देव नाही केली हो गणती
माझी अमाप हो माया माझी अमाप श्रीमंती…
धन असता हो गाठी मज चिंता हो कशाची
माझी शाळा पंढरपूर पुढे मर्जी विठ्ठलाची…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३० जून २०२३
वेळ : रात्री: ३: ०४