मळगाव येथे तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल ठार
सावंतवाडी
मळगाव कुंभारवाडी येथे शेतात गुरांना चारायला नेले असताना तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. न्हानू दशरथ खडपकर (रा. कुंभारवाडी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाताना तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला झाल्याने सुदैवाने शेतकरी बचावला अन्यथा अनर्थ घडला असता.
ऐन शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार, वायरमन प्रितेश हळदणकर, संतोष गांवकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती श्री पंचम खेमराज चे निवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी महावितरणला दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत पशुधन अधिकारी कृषी अधिकारी व तलाठी यांना कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे.
त्यानंतर महावितरणचे ओरोस सिंधुदर्ग येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार असून बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल, अशी माहिती लोहकरे यांनी यावेळी दिली. दरम्यान महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या कमजोर झाल्या असल्याची माहिती आपण वेळोवेळी दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला. नशिबाने शेतकरी वाचला अन्यथा मोठा प्रसंग उडवला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी गणपत शिरोडकर यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच स्नेहल जामदार, स्थानिक शेतकरी गणपत शिरोडकर, ग्रामपंचायत सदस्य अनुजा खडपकर, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खडपकर, बाबुराव खडपकर, सद्गुरु शिरोडकर, मंगेश खडपकर, रोहित शिरोडकर, आनंद राणे आदी उपस्थित होते.