आचरा/ मालवण :
‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे’ सारख्या कवी पी. सावळाराम यांच्या रिमझिम पाऊस गाण्यापासून ‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे’ ह्या उधाण वर्षा गीतापर्यंत अनेक ओलीचिंब गाणी सादर होत होती. ८ वर्षापासून ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांचे पाय एका ठेक्यात थिरकत होते. गोष्टी, गप्पा, गाणी यांचा धुवाॅंधार पाऊस पडत होता आणि आचरे येथील जामडूल बेटावरील निसर्गरम्य परिसर उत्साहाने ओथंबून गेला होता. निमित्त होते, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण आणि साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांचा संयुक्त वर्षा आनंद मेळावा!
सदर उभय संस्थांचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी सर्व ७५ सदस्यांचे रंगीबेरंगी गुलाब पुष्पे प्रदान करून स्वागत केले. *”टेन्शनला पेन्शन”* हे ब्रीदवाक्य मनात रुजवून सर्वजण ह्या आनंद मेळाव्यात प्रतिवर्षी सहभागी होतात.
सदर आनंद सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मालवणी कवी रुजारिओ पिंटो आणि मालवणी कवयित्री सुनंदा कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे आगळे वेगळे स्वागत मधुरा माणगावकर यांनी कवी सुरेश ठाकूर यांची ‘आचऱ्याचो पावस” ही कविता वाचून करण्यात आले. त्यानंतर उभयतांच्या हस्ते सरस्वती पूजनाने आनंद सोहळ्याचा शुभारंभ झाला. रुजारीओ पिंटो आणि सुनंदा कांबळे यांच्या कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवडल्या गेल्यामुळे उभयतांचा अनुक्रमे सुरेंद्र सकपाळ आणि रविंद्र वराडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपूर्ण दिवसभर केशवसुत, कुसुमाग्रज, आरती प्रभू, बालकवी, ग्रेस अशा मराठीतील कवींच्या नावाची पाच कुले स्थापन करण्यात आली होती. त्या कुलांचे कुलगुरू म्हणून लक्ष्मणराव आचारेकर, अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, रवींद्र वराडकर, चंद्रशेखर हडप ह्या ज्येष्ठ कोमसाप सदस्यांना नियुक्त करण्यात आले होते. तर कुलसचिव म्हणून रामचंद्र (तातू) कुबल, नवनाथ भोळे, श्रुती गोगटे, गुरुनाथ ताम्हणकर, भावना मुणगेकर यांनी कार्यभार सांभाळला होता. प्रत्येक कुलातील कार्यक्रम वेळीच आणि दर्जेदार होण्यासाठी अनुक्रमे सुगंधा गुरव, अनिरुद्ध आचरेकर, रावजी तावडे, कामिनी ढेकणे, सायली परब यांनी जबाबदारी पार पाडली. ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंतचे सदस्य आपले वय विसरून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत होते. प्रार्थना, बाल गाणी, संवाद, विनोद, नृत्य, नाट्य, संगीत, भावगीत गायन, दशावतार, प्रासंगिक एकांकिका, रेकॉर्ड डान्स असे एकापेक्षा एक कार्यक्रम सादर होत होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग कोचरेकर यांनी केले होते. तर स्पर्धात्मक कार्यक्रमाचे परीक्षण सर्वश्री विधांती नलावडे, त्रिंबक आजगावकर यांनी केले. तर प्रत्येक कुलातील विविध कार्यक्रमासाठी वर्षाराणी अभ्यंकर, प्रभा बावकर, मधुरा माणगावकर, उज्वला धनजी, ऋतुजा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
सदर आनंद मेळाव्याच्या संकल्पनेबद्दल सुरेश ठाकूर म्हणाले, “वर्षातून सर्व सदस्यांनी वर्षा ऋतूत एकत्र यावे. आपली नेहमीची दुःखे, काळजी, चिंता यांच्या होड्या अलगद पाण्यात सोडाव्यात आणि आनंदाने चिंब चिंब व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी जामडूल बेटावर करण्यात येते.”
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने द.शि. हिर्लेकर गुरुजींच्या पुस्तकांचे प्रकाशन याच आनंद मेळाव्यात करण्यात आले. तर साने गुरुजी कथामालेच्या वतीने जामडूल रिसॉर्टचे मालक डिवाईन फर्नांडिस आणि सुचिता फर्नांडिस यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.