चालकासह क्लीनर जखमी : उडी घेतल्याने बचावले
सावंतवाडी
गोव्याहून कुडाळच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मालवाहू डम्पर दहा ते बारा फूट खोल दरीत कोसळला. झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव सुतारवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. चालक व क्लीनरने वेळीच उडी घेतल्याने ते सुखरूप बचावले असले तरीही किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात डंपरचे ( एम. एच . ०८ एच २२००) मोठे नुकसान झाले आहे. महामार्गालगतचे रेलिंग तोडून हा डंपर खोल दरीत कोसळला आहे. मालवण चौके येथील हा डंपर असून मुकेश रूपलाल असे चालकाचे नाव आहे. अपघातस्थळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ जमले आहेत. याबाबतची माहिती भगवान रेडकर व सूनील खानोलकर यांनी दिली आहे.