सा.बा विभागाकडून मागवणार बोटी, वेळीच उपायोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा अजित नाडकर्णी
फोंडाघाट
जूनमध्ये निवांत असलेल्या पावसाने जुलैमध्ये प्रचंड जोर धरला आहे. सतत होणाऱ्या जोरदार वृष्टीमुळे फोंडाघाट एसटी स्टँडवर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे साचलेल्या पाण्याने तळ्याचे स्वरूप घेतले आहे. याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम खाते का एसटी स्टँड? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी विचारला आहे.
फोंडाघाट एस.टी.स्टँडवर धोपराएवढे पाणी साचल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनीक बांधकाम विभाग गावभर गटारे मारतय आणि एस टी स्टँडवर पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे का नाहीत? कोणाची कृपादृष्टी असा सवालही नाडकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केला आहे. फोंडाघाट एसटी स्टँडवर साचलेल्या पाण्याचे सर्व फोटो आमदार नितेश राणे यांना पाठवणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. सार्वजनीक बांधकाम याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. साचलेल्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोटी मागवणार असल्याचे ते म्हणाले. यावर वेळीच उपाय योजना न झाल्यास फोंडाघाटवासीयांना घेऊन आंदोलन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.