You are currently viewing “पेरते व्हा अक्षर दैनिकाने मधुभाईंचे स्वप्न साकार !”- रुजारियो पिंटो

“पेरते व्हा अक्षर दैनिकाने मधुभाईंचे स्वप्न साकार !”- रुजारियो पिंटो

मालवण :

 

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांचे *’पेरते व्हा!’* हे डिजिटल दैनिक लिहिणाऱ्या नवनवीन हातांना चालना तर देत आहेच, पण ज्या हेतूने सदर संस्थेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उर्फ मधुभाई यांनी ही संस्था स्थापन केली; त्या संस्थापकांचे स्वप्न साकार करीत आहे,” असे उद्गार रुजारीओ पिंटो, केंद्रीय सदस्य यांनी आज काढले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या ‘पेरते व्हा!’ दैनिकाच्या हिरक महोत्सवी अंकाला शुभेच्छा देताना त्यांनी हे उद्गार काढले.

लिहिणाऱ्या हाताला चालना आणि स्फूर्ती मिळावी म्हणून कोमसाप मालवणचे हे डिजिटल अक्षर दैनिक सुरू केले. त्याचा शुभारंभ मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला करण्यात आला. पावश्या पक्षाची पेरते व्हा ही हाक मृगाच्या हंगामात रुमणी बरोबर लेखणी हातात धरणाऱ्या नवीन लेखकांना करण्यात आली.

वैजयंती करंदीकर, सदानंद कांबळी, वंदना राणे, अदिती मसुरकर, वर्षाराणी अभ्यंकर, रश्मी आंगणे, तेजल ताम्हणकर, शिवराज सावंत, देवयानी आजगावकर, ऋतुजा केळकर, पूर्वा खाडीलकर, रसिका तेंडोलकर, नारायण धुरी, दिव्या परब, मधुरा माणगावकर, विठ्ठल लाकम हे लेखक सदर दैनिकात आपले अक्षर योगदान दररोज देत आहेत. ललित लेख, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे, अलक स्फूट, लघुकथा आदी वेगवेगळे साहित्यिक प्रकार हाताळत असून सातत्यपूर्ण सदर दैनिकाला अक्षर सेवा देत आहेत. सदर डिजिटल अंकाचे संपादन सुरेश शा. ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांचे असून उपसंपादक म्हणून गुरुनाथ ताम्हणकर , उपाध्यक्ष कोमसाप मालवण हे काम पाहत आहेत.

सदर उपक्रमाबद्दल माहिती सांगताना सुरेश ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण म्हणाले, “कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या लेखनातून, भाषणातून, गाठीभेटीतून कोकणी माणसालाच नाही तर मराठी साहित्य सृष्टीतील सर्वांच्या जीवनातले क्षण कृतार्थ केलेले आहेत. आज नव्वदी पार केलेले असतानाही त्यांचा अक्षर यज्ञ चालूच आहे. त्यांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली, त्यांचा हेतू पूर्णत्वास जावा म्हणून मी हे डिजिटल दैनिक सुरू केले. त्यामुळे अनेक लिहिणाऱ्या नूतन हातांना चालना मिळत आहेत.

सुरेश ठाकूर यांनी यापूर्वी ‘मी वाचले, मला आवडले, तुम्हीही वाचा’, ‘माझे आजोळ’, ‘कवितेच्या बनात’ आदी अनेक उपक्रम राबविलेले आहेत. ‘पेरते व्हा!’ या डिजिटल दैनिकाचे सर्व थरातून स्वागत होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा