भाजपची घंटानाद आंदोलने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच…
हरी खोबरेकर : केंद्राकडील राज्याचा जीएसटी मिळवून देण्यासाठी भाजपने आंदोलन करावे…
मालवण प्रतिनिधी,
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने केलेली घंटानाद आंदोलने केली. प्रत्यक्षात बेरोजगार झालेला तरुण, बीएसएनएल, रेल्वेची समस्या, घसरलेला जीडीपी या गंभीर प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठीच भाजप विविध आंदोलने करत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.
जनतेची दिशाभूल करणारी आंदोलने करण्याऐवजी राज्य शासनाचा जो जीएसटी केंद्र शासनाकडे आहे तो मिळवून देण्यासाठी खरंतर भाजपने आंदोलन करण्याची गरज असल्याचा टोलाही श्री. खोबरेकर यांनी लगावला.
ते म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे उघडण्यासाठी काल भाजपच्यावतीने घंटानाद आंदोलने करण्यात आली. भाजपकडून सध्या केली जात असलेली आंदोलने ही जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सुरू आहेत. आज तरुणवर्ग बेरोजगार बनला आहे. कोलमडलेली बीएसएनएल, रेल्वेची व्यवस्था, घसरलेला जीडीपी हे विषय निदर्शनास आल्यास जनता भडकेल. या भीतीनेच वेगवेगळी आंदोलने भाजप करत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या आरोग्याच्या आणि हिताच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतले आहेत आणि घेत आहे. ठाकरे सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास असून तो कधीही डळमळणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लोकहिताचेच निर्णय घेतले आहेत. ठाकरे सरकारची लोकप्रियता वाढत असल्यानेच भाजपची नेतेमंडळी सैरभैर झाली असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने जनतेच्या डोळ्यातील धूळफेक करणारी आंदोलने थांबवावी आणि केंद्र शासनाकडे असलेली राज्याची जीएसटी मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचे धाडस दाखवावे असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.