तळेरे: प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारानुसार बहुजन समाजाने वाटचाल करणे आवश्यक आहे. आपल्याही कुटुंबामध्ये एक अहिल्या, एक जिजाऊ, एक शाहू महाराज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन श्रीमंत संयोगीताराजे छत्रपती यांनी केले. त्या कराड तालुका धनगर समाज स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत संयोगिता राजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नंदुरबारच्या तळोदा संस्थानचे श्रीमंत अमरजीत राजे, इन्कम टॅक्स कमिशनर डॉ नितीन वाघमोडे, उद्योगपती बाळासाहेब खरात, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत संयोगिता राजे पुढे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मानवतेच्या, समतेच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा इतिहास जाती-धर्मापुरता नव्हता. छत्रपती शिवरायांच्या नंतर तेवढ्याच तोला मोलाचे राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशातली पहिली सैनिकी महिलांची शाळा सुरू केली. हजारो मंदिरांचा जिर्णोध्दार केला. अहिल्यादेवींच्या दातृत्वास आणि कर्तुत्वास इतिहासामध्ये तोड नाही. राष्ट्रमाता जिजाऊंच्यामुळे स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवराय घडवण्यामागे खूप मोठे योगदान त्यांचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन सर्व महिलावर्गांनी आपल्या मुलांच्यावर संस्कार घडवावेत. छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या स्वतःच्या संस्थान मधून गोरगरीब वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या संस्थांमधून आरक्षण देणारे एकमेव छत्रपती शाहू महाराज. या देशातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज. त्यांनी धनगर आणि मराठा आंतरजातीय विवाहला प्राधान्य दिले. बहुजन समाजाने शैक्षणिक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. महानथोर पुरुषांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. धनगर समाजाने संघटित होऊन आपली स्वतःची प्रगती करणे आवश्यक आहे. धनगर समाजाला ज्या ज्या वेळीस जी जी मदत लागेल ती श्रीमंत संभाजी राजे व मी स्वतः करेन. आम्ही धनगर समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे कायम उभे राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
*प्रविण काकडे यांचे सिंधुदुर्ग-रत्नागिरीत मोठे काम*
प्रवीण काकडे यांचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुप मोठे काम आहे. विशेषत: शिक्षणापासून वंचित राहनार्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत.
यावेळी अण्णासाहेब डांगे यांना डिलीट पदवी मिळाल्याबद्दल, डॉ नितीन वाघमोडे यांची आयकर आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल, संभाजीराव काकडे यांची कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल व प्रा. डॉ. शंकर हजारे यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
*गुणवंतांचा गौरव *
यावेळी प्रा. डॉ. शरद गलांडे, प्रकाश पोळ, संपतराव शेंडगे, राजेंद्र मुळीक, रोहित ढेबे, शिवराज मोहिते, महेश हुलवान, रामचंद्र झोरे, सचिन शिंदे, लिना गोरे, अरविंद बघेल, विकास झोरे, शुभम पाटील, संजय शेडगे, तानाजी वगरे, आनंदराव लादे, प्रा. संध्या पाटील, रेखा दूधभाते, विश्वास शिंगाडे, विजया पाटील, शहाजीराव जाधव रामचंद्र यमकर यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच, यावेळी 135 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, कराडचे नगरसेवक विजय वाटेगावकर, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील भाऊ शेंडगे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सुभाषराव येळे, वडूच्या नगरसेविका आरती काळे व कराड तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन हुलवान यांनी, सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी, तर आभार समाधान शिणगारे यांनी मानले.