*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस या मतदारसंघावर दावा करणार असून या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सावंतवाडी तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सचिव रविंद्र उर्फ बाब्या म्हापसेकर यांनी सांगीतले.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यावर काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले प्रविण भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले आणि ते विद्यमान आमदार असल्यामुळेच त्यांना चांगले मतदान झाले तरी सुद्धा ते पराभूत झाले. प्रविण भोसले काँग्रेसमध्येच थांबले असते तर ते नक्कीच निवडून आले असते. हा एकच अपवाद सोडता राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा कधीही जास्त मते मिळाली नाहीत. 1999 ला मिळालेल्या मतांच्या आधारावर हा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. परंतू त्या नंतर ज्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढले त्यावेळी काँग्रेसच्या मतांच्या जवळपासही राष्ट्रवादी काँग्रेसला मते मिळाली नाहीत. 2014 मध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस वेगवेगळे लढले त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला 25 हजार मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 9 हजार मते मिळाली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नवखे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 13 हजार मते मिळाली आणि त्यानंतर सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 5 हजार मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची ताकद या मतदारसंघात आहे. प्रत्येक गावागावात काँग्रेसला मानणारे व काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळे आम्ही सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होणारी 2024 ची निवडणुक काँग्रेस मार्फत लढवण्यासाठी आग्रही आहोत आणि पक्षश्रेष्ठी सुध्दा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येणारी विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी आग्रही आहेत.