You are currently viewing खाजगी प्रवासी बसधारकांनी सुधारित मानक पध्दतीचे पालन करावे….

खाजगी प्रवासी बसधारकांनी सुधारित मानक पध्दतीचे पालन करावे….

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे ग्राहक पंचायतची मागणी.

वैभववाडी
मा. परिवहन आयुक्त यांच्यामार्फत खाजगी प्रवासी बसेस यांनी वाहतूक करताना अंमलात आणावयाची सुधारित मानक कार्यपद्धतीचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पर्यटक, प्रवासी वाहतूक करताना खाजगी प्रवासी बसेसकरिता पुढीलप्रमाणे सुधारित मानक कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करावे आणि खाजगी प्रवासी बस धारकांनी तिचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
यामध्ये खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोव्हिड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम २० (१) (द) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष स्वच्छ ठेवावे व उपस्थित कर्मचाऱ्यांनी मास्क, सॕनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या आहेत त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॕनिटायझर ठेवण्यात यावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी. कोव्हिड-१९ आजाराची प्राथमिक लक्षणे (उदा.ताप, सर्दी, खोकला) दिसत असल्यास त्यास प्रवासात प्रतिबंध करण्यात यावा. सर्व प्रकारच्या खाजगी कंत्राटी बस वाहनांमधून शंभर टक्के क्षमतेने पर्यटक, प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात यावी. चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृहचा वापर करण्याकरिता बस थांबवताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. तसेच बसमध्ये चढताना, उतरताना खानापानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना देण्यात याव्यात. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देऊ नये व कचराकुंडीचा वापर करावा. प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्यांचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकांची असेल. वरील सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुद्ध मोटर वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटरवाहन नियम १९८९, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टिकोनातून वरील कार्यपद्धतीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा