You are currently viewing लक्ष्मीपूजन ते जवानांबद्दल कृतज्ञता, रोहित पवारांचं ‘दिवाळी सेलिब्रेशन’

लक्ष्मीपूजन ते जवानांबद्दल कृतज्ञता, रोहित पवारांचं ‘दिवाळी सेलिब्रेशन’

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनी’त परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन केलं. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कुंती देखील हजर होत्या. तर दुसरीकडे त्यांच्या घरी त्याच्या आई (सुनंदाताई) आणि वडील (राजेंद्र पवार) यांनी देखील मनोभावे लक्ष्मीपूजन केलं. तसेच ही ‘दिवाळी सर्वांसाठी आनंदाची, नवचैतन्याची आणि आरोग्यदायी जावो’, अशी प्रार्थना केली.

 

रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्त सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “आज आपण सर्वजण सीमेवर अहोरात्र लढा देणाऱ्या आपल्या शूर जवानांमुळं दिवाळी मोठ्या आनंदात, उत्साहात साजरी करत आहोत. त्यामुळं दिवाळीचे दिवे लावताना कृतज्ञतेचा एक दिवा त्यांच्यासाठीही लावा. जे सैनिक सीमेवर दृष्य शत्रूशी आणि जे कोरोना योद्धे आपल्यासाठी अदृश्य शत्रूशी लढत आहेत!”

 

रोहित पवार यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक ठिकाणी दुकानांचं उद्घाटनही केलं. राशीन येथे विकास आणि वैभव काळे यांनी सुरू केलेल्या श्री. किराणा अँड कोल्ड्रिंक्स या दुकानाचं उदघाटन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.करपडी येथेही विवेक काळे आणि वैभव या काळे बंधूनी सुरू केलेल्या कृषी उद्योग समुह दुकानाचं उद्घाटन करून रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काळे कुटुंबीय, युवा कार्यकर्ते आणि मित्र परिवार उपस्थित होते.

 

जामखेडमधील अमोल गिरमे, वसीम सय्यद, गणेश म्हस्के व नागेश गवळी या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरणही त्यांनी केलं. यावेळी स्पर्धकांशी संवाद साधताना बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन अधिकाधिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा