You are currently viewing महापालिकेत आय. ए. एस. दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी

महापालिकेत आय. ए. एस. दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची सेवा जेष्ठतेवर बदली झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील कामे ठप्प झाल्याने महापालिकेत आय. ए. एस. दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी माजी आरोग्य सभापती दिपक ढेरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की , इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून ओळखली जाते. काही महिन्यापूर्वी नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेमध्ये झाले आहे. सुधाकर देशमुख हे आयुक्त म्हणून कार्यरत होते. परंतू त्यांची काही दिवसापूर्वी सेवाजेष्ठतेवर मुंबई येथे बदली झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील कामे ठप्प झाली आहेत. प्रशासनाची जबाबदारी आय.ए.एस. केडर दर्जाच्या अधिकार्‍यांकडे देणे गरजेचे आहे. महापालिकेत जास्त प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. काही ठरावीक माजी नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर सर्वप्रकारची टेंडर घेत असतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. इचलकरंजी शहराचे अनेक प्रश्‍न भिजत पडले आहेत. वाढते अतिक्रमण, रस्ता रुंदीकरणाचे प्रलंबित प्रस्ताव, पाणी योजना, म.न.पा. मधील वाढता भ्रष्टाचार, मक्तेदारांची साखळी यासारख्या प्रश्‍नांना आय.ए.एस. अधिकारी नियुक्त करणे हेच उत्तर आहे. सनदी अधिकारी नेमण्यास काही तांत्रीक अडचण असल्यास ती दूर करुन खास बाब म्हणून आपण इचलकरंजी महापालिकेत आय.ए.एस. दर्जाच्या आयुक्तांची नियुक्ती करावी, असे ढेरे यांनी शेवटी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा