*लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री स्मिता भलमे लिखित अप्रतिम ललित लेख*
*🌷वैष्णवांचा मेळा आनंदाचा सोहळा🌷*
लग्न होऊन पुण्यात आले.तरी मी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतले नव्हते. संसार सुरू झाला होता . हळूहळू लोणच्या सारखा संसार मुरायला सुरुवात झाली होती. तेंव्हा पुण्यात असून आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतले नाही. याची खंत वाटली.
मग एकदा अगदी ठरवून माऊलीच्या पालखीच्या दर्शनाला गेले. पालखी विविध फुलांनी सजली होती. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळला होता. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती . वारकरी…. कपाळी गंध, गळ्यात तुळशीमाळ, हाती टाळ – मृदुंग आणि मुखात विठ्ठल नाम. काही स्त्रियांनी डोक्यावर तुळशीवृंदावन ठेवले होते.असे हे वारकरी टाळ-मृदुंगाच्या तालात नाचत होते.पुढे जात होते. मीही पुढे सरसावले. पालखी पर्यंत जाता येते की नाही असे वाटले . पण पोहोचले एकदाची.पालखीला स्पर्श केला. माथा माऊलीच्या पायी टेकवला. अन् मन भरून आले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पालखी पासून बाजूला झाले. तरी डोळ्यातून अश्रू वाहतच होते. दहा पावले तरी पालखीबरोबर चालावे म्हणून……
मी पालखी बरोबर चालू लागले. पण नंतर जाणवले कोणीतरी मला नेत होते.आपोआप ‘ पाऊले चालती पंढरीची वाट ‘ याचा प्रत्यय आला. चालता चालता टाळ- मृदुंगाच्या तालावर वारकरी फेर धरून नाचत होते. हरिनामाचा गजर वातावरणात दुमदुमला होता. आजूबाजूच्या झाडांची पाने टाळ – चिपळ्या सारखी वाजत होती. वारकऱ्यांच्या पावलांनी धूळ उडत होती. पण तीही ज्ञानेश्वर माऊली , तुकारामाचा गजर करत होती. वाऱ्याची झुळूकही ‘ बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवंभावे ! ‘ असं गुणगुणत वाहत होती. त्या आभाळाचेही या पालखी सोहळ्याने मन भरून आले. त्याचा आनंद व भक्तीभाव त्याच्या डोळ्यातून थेंबांच्या रूपाने ओघळले आणि फुलांचा सुगंध सोबत घेऊन व ‘ भेटी लागी जीवा लागलीसे आस ‘ असं म्हणत पालखीवर उतरू लागले. वारकरी त्या सुगंधी गारव्याने सुखावले. भक्तीभावाने साऱ्यांची हृदये उचंबळून चिंब चिंब भिजली होती. सारे वातावरणच भारावले होते . भक्तीचा गुलाल सर्वत्र उधळलेला होता.
कुणीतरी माझा हात ओढला आणि मलाही त्या वारकऱ्यांच्या मधे ओढले. नकळत पाय वारकर्यां बरोबर थिरकू लागले. मी एकटी नव्हते समोर तो साजिरा गोजिरा सावळा विठूराया कमरेवर हात ठेवून मिस्किलपणे माझ्याकडे पाहून हसत होता. नंतर त्यानेही कमरेवरचे हात काढले आणि कमरेची बासरी काढून मधुर आवाजात ती तो वाजवू लागला . साऱ्या गोपी भान विसरून फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कानात बासरीचे सूर आणि समोर ते साजीरे गोजिरे रूप डोळ्यात साठवत, पावले थिरकत हळू हळू पुढे चालली होती. बघता बघता तुकाराम, नामदेव सारे भक्तगणच फेर धरू लागले. वेळ काळ काही कळत नव्हते.
अचानक खांद्यावर हात पडला दचकून मागे पाहिले . साजिरी गोजिरी रखुमाई गालातल्या गालात हसत होती.ती म्हणाली, ” बाळ, दमलीस ना….? बस जरा. यावेळी एवढीच पावले पुरे गं….!आधी आपली कर्तव्ये पार पाड. घरी तुझी लेकरं वाट पाहत आहेत. जा आणि आधी त्यांना सांभाळ .” ते ऐकताच मी भानावर आले . आता कळले मी खूप दूर पर्यंत चालून आले होते. लेकरांची आठवण आली. पुन्हा एकदा तृप्त मनाने पालखीचे दर्शन घेतले. आणि ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ चा अनुभव घेऊन घराकडे वळले.
– स्मिता भलमे
– ९४२१०५८१४९