You are currently viewing साने गुरुजी कथामाला मालवण कथा महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

साने गुरुजी कथामाला मालवण कथा महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर

मावळ्यांच्या कथा, गुरु-शिष्य कथा, महिला वैज्ञानिक कथा या विषयांचा समावेश.

 

मालवण :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे आयोजित *कथा महोत्सव स्पर्धेचा* कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून शाळास्तर, वर्ग स्तर स्पर्धा ५ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तर अंतिम स्पर्धा *रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी* ‘कथामाला मित्र मारुती आचरेकर कथा नगरीत’ संपन्न होणार आहेत. शिवरायांच्या मावळ्यांच्या शौर्य कथा (इयत्ता ३री, ४थी), गुरु-शिष्यांच्या कथा (इयत्ता ५वी, ६वी), तर महिला वैज्ञानिकांच्या विज्ञान शोधकथा (इयत्ता ७वी, ८वी) असे विषय निवडण्यात आले आहेत.

*”संस्कारांची जपणूक आणि बचतीचे संस्कार”* या संयुक्तिक ब्रीदवाक्याखाली साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे मालवण या दोन संस्था गेली एक तप या स्पर्धा प्रतिवर्षी घेत आहेत. भरघोस रोख पुरस्कार, दर्जेदार प्रमाणपत्र, चोखंडळ ग्रंथभेट आणि शिस्तबद्ध आयोजन यासाठी या स्पर्धा केवळ तालुक्यातच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नामांकित कथाकथन स्पर्धा म्हणून ओळखल्या जातात. प्रतिवर्षी विषयांचे वेगळेपण सर्वांनाच अचंबित करणारे असते. मालवण तालुक्यात १२५ शाळा कथामाला उपक्रमाशी निगडित आहेत. ३० एप्रिल २०२३ पूर्वी कथामालेशी संलग्न शाखा या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मुलांची वाचनाची ओढ वाढावी, त्यांच्या वक्तृत्व कलेचा विकास व्हावा आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या एकाच उद्देशाने मालवण तालुक्यातील कथामाला कार्यकर्ते गेली बारा वर्षे हा उपक्रम सातत्यपूर्ण राबवित असतात. दरवर्षी शाळा आरंभादिवशीच हे परिपत्रक शाळांच्या हाती पडते आणि पुढे तयारीला लागतात. “शाळा तेथे कथामाला आणि प्रत्येक मुलांसाठी कथा” हा मालवण कथामालेचा उपक्रम आहे.

मालवण कथामाला मुलांसाठी नाट्य शिबिरे ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरे, निसर्ग निरीक्षण सहली, यात्रेकरूंसाठी पाणपोई, छंद वर्ग आदी विविध उपक्रम राबवीत असते.

अलीकडे शनिवार दिनांक १७ जून २०२३ ला सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली कथामालेची सभा आचरे नं. १ येथे झाली. त्यावेळी अध्यक्षांच्या वतीने कथाकथनाथनाचा वर्गस्तर, शाळास्तर आणि अंतिम स्पर्धा हा कार्यक्रम मंजूर करण्यात आला. “सदर कथामहोत्सवाची माहितीपत्रके मालवण तालुक्यातील शाळांना पोहोचतील”, अशी माहिती सुरेश शामराव ठाकूर यांनी दिली.

सदर सभेला सुगंधा केदार गुरव (सचिव), नवनाथ पांडुरंग भोळे (सहसचिव), पांडुरंग गुरुदास कोचरेकर (कोषाध्यक्ष) रामचंद्र एकनाथ कुबल, परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, अनिरुद्ध आचरेकर, सायली परब, चंद्रकांत माने, संजय परब, मनाली फाटक, श्रुती गोगटे, स्मिता जोशी, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, रावजी तावडे सहित बहुसंख्य कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा