अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार
ओरोस
आपल्या समाजाला गतिमान होण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी अभ्यासू असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सत्कार प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष व्हीक्टर फर्नांडिस यांनी केले.
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन मधील सभागृहात समाजातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा जाहीर सत्कार सोहळा नुकताच पार पडला. परिषद अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस, सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी विक्री संघ अध्यक्ष व्हिक्टर डांटस, मालवणी कवी बाबला पिंटो, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो, आजगाव उपसरपंच मायकल फर्नांडिस, सौ मारिया फर्नांडिस, उपसरपंच सौ कालेस्तीन आल्मेडा, सौ फिलसू फर्नांडिस, पास्कोल रॉड्रिग्ज, सौ मेरी फर्नांडिस, स्मिता फर्नांडिस, जोयल डिसिल्वा, मेगल डिसोजा यांच्यासह ख्रिस्ती विकास जिल्हा कमिटी सदस्य, ख्रिस्ती समाज कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना व्हिक्टर डांटस यांनी, समाजातील सर्व वर्गाला शिक्षण उपयोगी कार्यक्रम घेऊन सक्षम करण्याचा संदेश दिला. मालवणी कवी बाबला पिंटो यांनी, आपल्या कविता सादर केल्या, सरपंच मॅक्सि पिंटो यांनी, ग्रामपंचायत स्तरावरील विषय स्पष्ट करीत अल्पसंख्यांक योजनांची माहिती दिली. तर मेगल डिसोजा हिने ग्लोबल वॉर्मिंग विषयी मत स्पष्ट करताना पृथ्वीचे रक्षण कसे करावे ? याची माहिती देतानाच ग्लोबल वार्मिंग बाबत सुरू असलेल्या आपल्या कामकाजाची माहिती दिली. तसेच चांगला श्वास मिळण्यासाठी पृथ्वी रक्षणाकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. परिषदेचे उपाध्यक्ष कार्मिस आल्मेडा यांनी ख्रिस्ती विकास परिषदेच्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. ऍडविन डिसोजा यांनी सर्वांचे आभार मानले.